चार वर्षांच्या मुलाचे अपहरण करून चुलतीने केला खून

कडेगाव :
            वडियेरायबाग (ता. कडेगाव) येथील चार वर्षांच्या मुलाचे  अपहरण करून चुलतीने खून केला. राजवर्धन परशुराम पवार  असे त्या मुलाचे नाव आहे. चुलती शुभांगी प्रदीप पवार (वय २७) व तिचा भाऊ शंकर वसंत नंदिवाले (रा. तडसर ता. कडेगाव) यांना या प्रकरणी अटक केली. कडेगाव न्यायालयाने त्यांना १५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
           २१ जानेवारी २०२० रोजी परशुराम बापू पवार यांनी मुलगा राजवर्धन वडियेरायबाग येथील अंगणवाडी शाळेत सकाळ ११ च्या सुमारास जात असताना अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद चिंचणी (वांगी) पोलीस ठाण्यात दिली होती. या घटनेमुळे पोलीस चक्रावून गेले होते. त्यांच्यासमोर तपासाचे आव्हान होते. पोलिसांनी चुलती शुभांगी हिच्यावर तपास केंद्रित केला होता. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही घटना उघडकीस आणण्यासाठी बरीच मेहनत घेतली.
             राजवर्धन ची चुलती शुभांगी पवार हिच्यावर पोलिसांचा  संशय बळावल्याने पोलिसांनी तिचा कसून तपास केला. यावेळी दि.२१ रोजी राजवर्धन याचा घरातच तोंडावर उशी दाबून खून केला. यानंतर तिने तिचा भाऊ शंकर नंदिवाले याला बोलावून मुलाचा मृतदेह प्रवासी बागेत भरून हिंगणगाव खुर्द येथील ओढ्याच्या पात्रात बंधाऱ्याजवळ टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. राजवर्धन याचा ज्या ठिकाणी मृतदेह टाकला होता त्या ठिकाणी कवटी, हाडांचा सांगाडा, शाळेचे दप्तर व कपडे सापडले. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी करीत आहेत.