कोल्हापुरात ५० रुपयांच्या बिर्याणीसाठी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी.

कोल्हापूर-
           
           कोल्हापुरात शुक्रवारी आयोजित केलेल्या चिकन फेस्टिव्हलमध्ये खवय्यांची प्रचंड गर्दी झाल्याने एकच गोंधळ उडाला. फेस्टिव्हल हॉलच्या बाहेर लावण्यात आलेले बॅरिकेट्स मोडून काही हुल्‍लडबाजांनी थेट प्रवेश केल्यामुळे उडालेल्या गोंधळात अन्‍नाची खूप प्रचंड प्रमाणात नासाडी झाली. या गर्दीला पांगविण्यासाठी अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे  लोकांची पळापळ सुरू झाली. यामध्ये चेंगराचेंगरीही झाल्याने गोंधळात अधिकच भर पडली. या घटनेमुळे संयोजकांना अखेर चिकन फेस्टिव्हल बंद करावा लागला.
           कोल्हापूर मध्ये आयर्विन हायस्कूल शेजारी असणार्‍या हॉलमध्ये कोल्हापूर बिर्याणी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाही चिकन बिर्याणी, चिकन ग्रेवी आणि चिकन 65 हे पदार्थ ठेवण्यात आले होते. ‘चिकन खाण्याचे फायदे भरपूर, कमी कोलेस्ट्रोल भरपूर प्रथिने’ हे घोषवाक्य घेऊन हा फेस्टिव्हल भरविण्यात आला होता. यासाठी नाममात्र 50 रुपयाचे कुपन ठेवण्यात आले होते.
             संयोजकांनी 3 हजार 200 लोकांचे नियोजन केले होते. त्यापैकी 3 हजार कुपनची विक्री झाली होती. सायंकाळी फेस्टिव्हलचे अनौपचारिक उदघाटन करण्यात आले. या फेस्टिव्हलसाठी लोक साडेसहा वाजल्यापासूनच येत होते. 50 रुपयात शाही बिर्याणी मिळत असल्याची माहिती लोकांना कळेल तशी फेस्टिव्हलला गर्दी वाढत होती.
           रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रचंड गर्दी झाली. लोकांना पाय ठेवण्यासाठीही जागा नव्हती. त्यामुळे संधी मिळेल तेथून  आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. नऊ वाजण्याच्या सुमारास तर हॉलच्या बाहेर रस्त्यापर्यंत लोकांची गर्दी होती. अशा गर्दीतच काही हुल्‍लडबाजांनी बॅरिकेट्स तोडून आत प्रवेश केला आणि एकच गोंधळ उडाला. सर्वजण एकाचवेळी बिर्याणी घेण्यासाठी धावू लागल्याने चेंगराचेंगरी झाली.त्यामुळे पोलिसांना गर्दीला पांगविण्यासाठी बळाचा वापर केला. यामुळे एकच धावपळ उडाली.रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू होता. या गोंधळात अन्‍नाची मात्र प्रचंड नासाडी झाली.