भिलवडी परिसरातील रस्ते सुनसान
जनता कर्फ्यू ला शंभर टक्के प्रतिसाद...


भिलवडी :- (सिद्धार्थ कुरणे)
                कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी पुकारलेल्या देशव्यापी जनता कर्फ्युच्या आवाहनला भिलवडी मध्ये  नागरिकांनी १०० टक्के प्रतिसाद देत  लॉकडाऊन केल्याचे दृश्य रविवारी सकाळी पहावयास मिळाले .
               रविवारच्या कर्फ्युच्या चर्चा आधीच रंगत होत्या. नागरिकांनी अत्यावश्यक खरेदी शनिवारी संध्याकाळीच उरकली होती. रविवारी सकाळी शहरातील मुख्य बाजारपेठांचा भाग असलेला  परिसर,  हे भाग पूर्णत: बंद होते. परिसर हा  गजबजलेला भागही पूर्णपणे सुनसान होता.कोरोना विषाणुच्या संसर्गाचा एकजुटीने व एकदिलाने सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जनता कर्फ्यूला रविवारी शहरात सकाळीच सुरुवात झाली. सकाळी व्यायाम, मॉर्निंग वॉक व फिरायला येणाऱ्या लोकांनी घराबाहेर येणे टाळले. दिवस उजाडताच रस्त्यावर,  होणारी गर्दी दिसून न आल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. त्यामुळे शहरात सकाळपासूनच अघोषित संचारबंदी सुरू झाली होती. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश   दिले आहेत. त्यामुळे कालपासूनच बहुतांश ठिकाणी लोकांनी स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे टाळले. शहरे आणि ग्रामीण भागात जणू कालपासूनच लोकांनी बंद सुरू केला.
               कोरोना विषाणुचा संसर्ग एकमेकांच्या जवळ जाण्याने होत असल्यामुळेच लोकांनी गर्दी करू नये, एकमेकांच्या जवळ जाऊ नये आणि घरीच थांबावे, यासाठी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूची कल्पना मांडली आहे.रस्त्यांवर पोलिसांच्या गाड्या फिरताना दिसत होत्या. तर चौकाचौकात वाहतूक पोलिसांसह खाकी वर्दीतले पोलिसही तैनात होते. रस्त्याने जाणाऱ्या क्वचितच दिसणाऱ्या एखाद्या व्यक्तीला थांबवून तो कुठे व कशासाठी जात आहे याची चौकशी केली जात होती.रात्री ९ वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी स्वयंस्फूर्त असेल, यात वाद नाही.