हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित शिक्षिकेने घेतला अखेरचा श्वास
नागपूर:हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील पीडित शिक्षिकेने तब्बल आठ दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर सोमवारी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.
पीडित शिक्षिकेचा मृत्यू झाल्याचे कळताच तिच्या आईने हंबरडा फोडला. वडीलही ओक्साबोक्शी रडत होते. माझ्या मुलीला जसे जाळले तसेच त्या नराधमाला जाळा किंवा त्याला फाशीची गंभीर शिक्षा द्या, असे पिडितेची आई म्हणत होती. तर आता मी जगणार कसा असे रडत रडत तिचे वडील बोलत होते.
हिंगणघाट येथील हे जळीत प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असून प्रसिध्द सरकारी वकील अॅड. उज्वल निकम हा खटला लढणार आहे.
नागपुरातील ऑरेंज सिटी रूग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते. पीडितेला वाचविण्यासाठी ऑरेंज सिटी रूग्णालयाच्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. या पीडितेवर उपचार करण्यासाठी मुंबईहून प्रसिध्द बर्न स्पेशलिस्ट डॉ. सुनिल केशवानी यांच्यासह त्यांचे तज्ज्ञ पथक नागपुरात तळ ठोकून होते. दरदिवशी विविध पध्दतीने उपचार आणि शस्त्रक्रिया करून पीडितेला जीवनदान देण्यासाठी या सर्वांनीच अहोरात्र मेहनत घेतली. पण अखेर पीडित शिक्षिकेची प्राणज्योत मालवली.
विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे भर चौकात दिवसाढवळ्या शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी ३ फेब्रुवारीला घडला होता. कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या या पीडित तरुणीला भरचौकात तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्यात आले. शिक्षिकेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या विकेश उर्फ विक्की नगराळे या नराधमाने ही घृणास्पद कृत्य केले होते. हिंगणघाट येथील नंदेरी चौकात ही घटना घडली. या तरुणीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने नागपुरातील ऑरेंज सिटी रूग्णालयात उपचारकरीता दाखल करण्यात आले होते. या घटनेत पीडित शिक्षिकेचा चेहरा पूर्णपणे जळाला होता. गळ्याच्या आतील बाजूस गंभिर इजा झाल्याने तिची वाचाही गेली होती. तर डोळे, नाक, ओठ सर्वच जळाल्याने तिच्या चेहर्याचा कोळसा झाला होता. फुफ्फूसातील नळ्यांमध्ये धूर गेल्यामुळे तिच्या श्वासनलिकेत श्वास घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या.
0 Comments