कराड पालिकेतर्फे वाघेरीत 65 नागरिकासाठी विलगीकरणाची सुविधा
कराड:- सुरज घोलप
             कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी येथील पालिकेतर्फे विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. संभाव्य धोका विचारात घेवुन येथील पालिकेने वाघेरी-करवडी दरम्यान विलगीकरण कक्ष सुरु करण्याची तयारी केली आहे. तेथे 25 रुग्णांची तर वाघेरी येथील एका डिप्लोमा महाविद्यालयात 40 रुग्णांच्या विलगीकरणाची सोय तेथे करण्यात येणार आहे.कोरोनाच्या मुकाबल्यासाठी शासन सज्ज झाले आहे. त्याअंतर्गत येथील पालिकेमार्फत शहरात सॅनीटायझरची फवारणी, स्वच्छता, दारात भाजी पोचवण्याची व्यवस्था, भाजी मंडईत सोशल डीस्टन्सचा प्रयोग, लोकांमध्ये जनजागृती आदी उपक्रम राबवण्यात आले आहेत. त्याचबरोबर नागरी आरोग्य केंद्रामार्फत जे लोक परदेशातुन आले आहेत. त्यांच्यावर नजर ठेवुन आवश्यक ती काळजी घेण्याचीही कार्यवाही सध्या सुरु आहे. कोरोनाचा व्हायरस किती वाढेल हे सांगता येत नाही. त्यामुळे संभाव्य धोका विचारात घेवुन प्रशासन आणि पालिकेमार्फत आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
           त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने शहरापासून काही अंतरावर असलेल्या वाघेरी-करवडी येथे विलगीकरण कक्ष सुरु केला आहे. त्यामध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तेथे 25 रुग्णांची तर शेजातीलच प्रेमीलाताई चव्हाण डिप्लोमा महाविद्यालयात 40 रुग्णांची सोय होईल अशी व्यवस्था करण्यात आल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले.
            ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेमार्फत विविध उपोययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत शहरातील कोणी कोरोनाने बाधीत होणार नाही, कोणी उपवाशी राहणार नाही याचीही काळजी घेतली आहे. भविष्यातील खबरदारीचे उपाय म्हणून वाघेरी - करवडीनजीक एक हॉस्पीटल ताब्यात घेण्यात आले आहे. तेथे 25 रुग्णाच्या विलगीकरणाची सोय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाघेरी येथील प्रेमलाताई चव्हाण डिप्लोमा महाविद्यालयही ताब्यात घेण्यात आले आहे. तेथे 40 रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. नागरीकांनी आत्यावश्यक काम असल्याशिवाय घाबरुन न जाता घराबाहेर पडू नये, असे आवाहन आहे.