अब की बार सोन्याचा  दर 45 हजार पार.


सांगली:-
            जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात जबरदस्त तेजी आल्याच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या भावाने नवी उच्चांकी पातळी गाठली आहे. सांगली सराफा बाजारात शनिवारी सोन्याचा प्रति 10 ग्रॅम अर्थात तोळ्याचा दर 45 हजार रुपयांच्याही पुढे गेला. दुपारच्या सत्रात सोन्याचा दर 45 हजार 343 रुपयांवर गेला होता.

        चीन मधील कोरोना विषाणूमुळे जागतिक अर्थकारणात खळबळ उडाली असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची प्रचंड प्रमाणावर खरेदी होत आहे. आगामी काळात सोन्याचे दर 50 हजार रुपये प्रति तोळ्यावर जाण्याचा अंदाज सराफा बाजारातील तज्ज्ञ व्यक्‍त करीत आहेत.
       काही दिवसांपूर्वीपर्यंत सोन्याचे दर 42 हजार रुपयांच्या आसपास रेंगाळत होते. मात्र, मागील दहा दिवसांत सोन्याच्या दरात मोठी तेजी आली आहे. गुरुवारी सोन्याचे तोळ्याचे दर 44 हजार 570 रुपयांवर पोहोचले होते. त्यात आणखी 670 रुपयांची वाढ होऊन सोने 45 हजार 240 रुपयांवर गेले. चांदीच्या प्रति किलोच्या दरातही 192 रुपयांनी वाढ होऊन चांदीचे दर 48 हजार 180 रुपयांवर पोहोचले. एकीकडे सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे.