या फोटो मुळे संपूर्ण जग रडले
सध्या ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या वणव्यात अनेक पशू पक्षी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले तेथील अनेक फोटोंनी कासावीस व्हायला होतंय. तिथलाच हा फोटो जागतिक मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला. फोटोसोबतची माहिती वाचून कोणत्याही संवेदनशील व्यक्तीस गहिवरून येईल अशा घटनेची ही तसबीर आहे. या चिमुरडीचे नाव शेर्लोट ऑडॉयर. तिच्याजवळ मागच्या बाजूस दिसणाऱ्या शवपेटीत तिच्या प्रिय वडिलांचे पार्थिव ठेवलेलं आहे.
तिच्या वडीलांचे नाव अँड्र्यू. ते एक बहादूर फायर फायटर होते. ते जगलातील आग वीजवत असताना शहीद झाले व मंगळवारी त्यांचा अंत्यविधी झाला तेंव्हा ही चिमुरडी तिथं उपस्थित होती. शवपेटीवर ठेवलेलं आपल्या पित्याचे हेल्मेट तिने नकळत उचलून घेतलं आणि आपल्या डोक्यावर ठेवलं. कदाचित तिला त्याची सवय असावी.
वणवा विझवण्यासाठी प्राणाची बाजी लावून हौतात्म्य पत्करलेल्या पित्याचे हेल्मेट परिधान करून ती सहजतेने इकडे तिकडे वावरू लागली तेंव्हा उपस्थित फायरमेन्सचे डोळे पाणावले.
आपल्या वडीलांना काय झालंय हे कळण्याचे तिचे वय नाही. शाळेच्या पहिल्या दिवशी वा अखेरच्या दिवशी वा आयुष्यातील कोणत्याही सुखदुःखाच्या प्रसंगी तिला आपल्या पित्याची उणीव जाणवेल. कधी ठेचकाळून पडली तर तिला हात द्यायला तिचे वडील नसतील, तिच्या गरजा पूर्ण करायला आणि तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दयायला पित्याची जागा कुणीच भरून काढू शकणार नाही.
सत्य उमजल्यावर समज आल्यावर ती कदाचित हमसून हमसून रडेल देखील, मात्र जग तिला नेहमी सांगत राहील की तुझे वडील रिअल लाईफ हिरो होते ! आपल्या वडीलांची किर्ती तिला आयुष्यभर सन्मार्गाने आणि अभिमानाने जगण्याची प्रेरणा देत राहील.
0 Comments