सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकण्यात आल्या कडकनाथ कोंबड्या आणि अंडी


सांगली:-
इस्लामपूर-सांगली रस्त्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा जात असताना हे आंदोलन करण्यात आलंसांगलीत मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकत निदर्शन करण्यात आलं. स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हे निदर्शन कऱण्यात आलं. इस्लामपूर-सांगली रस्त्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा जात असताना स्वाभिमानी पक्षाच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी ताफ्यासमोर येत कडकनाथ कोंबड्या फेकल्या. स्वाभिमानी पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

पश्चिम महाराष्ट्रात सध्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्याचा विषय चांगलाच गाजत आहे. याच प्रकरणी चौकशी कऱण्याची मागणी करण्यासाठी स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपुर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कडकनाथ कोंबडी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहाराचा अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) तपास केला जावा अशी मागणी केली होती. शेट्टी यांनी मुंबईमधील ईडी कार्यालयात जाऊन यासंदर्भातील ईडीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी केली होती.