गड किल्ल्यावर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांनो सावधान, आता  होणार कारावास


              गड किल्ल्यावर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांनो सावधान, आता कारावास होणार. महाराष्ट्रातील गड किल्ल्यावर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना यापुढे सहा महिने सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. दुसऱ्या वेळेसही असं कृत्य तो व्यक्ती करताना आढळून आला तर त्याला एक वर्षाचा सश्रम कारावास होईल. महाराष्ट्र सार्वजनिक दारूबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी केली असून गड किल्ल्यावर गैरवर्तन करणाऱ्यांना ही शिक्षा लागू होणार आहे. गड किल्ल्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्या तळीरामांवर आणि गैरवर्तणूक करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार असल्याची आदेश गृह विभागाने जारी केला आहे. महाराष्ट्रातील गड किल्ले हे महाराष्ट्राच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत.
            गडकिल्ल्यांचे पूर्णपणे पावित्र्य राखणे गरजेचे आहे. मात्र, या गडकिल्ल्यांना भेट देताना काही समाजकंटक मद्यपान करुन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतात. सार्वजनिक शांततेस बाधा पोहचेल असे गैरप्रकार, गैरवर्तन करणे, किल्ल्यावरील वैभवशाली पुरातन वास्तूचे नुकसान करणे यासारखे पावित्र्य भंग करण्याचे प्रकार करीत आहेत. अशा प्रकारे गड, किल्ल्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्या समाजकंटकांना आळा बसावा या दृष्टीकोनातून राज्य सरकारकडून सूचना देण्यात आल्या आहेत.